यावल/चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा तालुक्यात मजरेहोड फाटा येथे शिवनेरी बस आणि कारचा समोरासमोर येऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोपडा-नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी 6 वाजता निघाली. काही वेळातच चोपड्या पासून ५ किमी अंतरावरील सूतगिरणी जवळ शिवशाहीची समोरून येणाऱ्या सुझुकी रिच (एमएच १४ एफएन ७२०२) या कारचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व ती शिवनेरी बसला धडकली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचा चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. कारमधील प्रवाशी हे निजामपूर ते मनूदेवीला जाणाऱ्या दिंडीसाठी महाप्रसादासाठी जात असताना दुर्देवाने काळाने त्याच्यावर झडप घातली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.