पाचोरा प्रतिनिधी । गोराडखेडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून भक्तांकडून मागणी करण्यात येणाऱ्या भगवान शंकराच्या नियोजित मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवलिंगाचे नामकरण आणि प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
नियोजित कार्यक्रमानुसार दि २० शुक्रवार रोजी शिवलिंगाची मिरवणूक काढून टाळ मृदुंगाच्या गजरात शिवलिंगाच्या मूर्तीचे घरोघरी स्वागत करत औंक्षण करण्यात आले. यानंतर पुरोहित ज्ञानेश्वर पुराणिक, वैभव जोशी, उदय कुलकर्णी, गौरव पाठक, सतीश वाघ, विवेक जोशी आदींच्या मार्गदर्शनाखाली दि २१ शनिवार रोजी गावांतील एकोणीस दाम्पत्य जोडीणी शिवलिंगाच्या मूर्तीचे पूजन करून शिवलिंगास धान्य निवास देण्यात आला.
यानंतर दि २२ रविवार रोजी होमहवन पूजेनंतर शिवलिंगाचे नाव गावाच्या नावावरुन गोराडेश्वर असे नामकरण करुण शिवलिंगाचे जलपूजन करण्यात आले. यानंतर दि २३ सोमवार रोजी प्रातः ५.३० वाजेपासून पूजेस व होमहवणास प्रारंभ होऊन ब्रह्ममुहूर्तावर कळस, शिवलिंग व नंदेश्वराची स्थापना करण्यात आली. प्रसंगी आडगाव ता. चोपडा येथील गुरुवर्य देवगोपाल शास्त्री महाराज यांच्या हातून कळस चढवत शिवलिंग व नंदिश्वराची स्थापना करण्यात आली. यानंतर ह भ प पोपट महाराज यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. नंतर प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.