Home Cities जामनेर कपिलधार येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा उत्साहात 

कपिलधार येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा उत्साहात 


पहूर (ता. जामनेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कपिलधार येथे शिवा संघटनेचा तिसावा राज्यव्यापी मेळावा मोठ्या जल्लोषात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. मन्मथ माऊलींच्या शासकीय महापूजेनंतर शिवा मैदानावर या भव्य सोहळ्याची सांगता झाली. समाजातील सर्व स्तरातील शिवा मावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि हजारोंच्या संख्येतील उपस्थितीमुळे मेळावा अत्यंत यशस्वी ठरला.

या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री   ना. बाबासाहेब पाटील, शिवा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ओबीसी चळवळीचे प्रणेते प्रा. मनोहर धोंडे, अर्चनाताई चाकुरकर, आमदार बब्रुवान खंदाडे, गुरुवर्य तमलुरकर अप्पा, राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर, आचार्य गुरुराज महाराज अहमदपुरकर, महादेव शिवाचार्य, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरकर यांच्यासह अनेक गुरुवर्य, मान्यवर आणि नेते उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या विभागीय नेत्यांनी, जिल्हाध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला उत्साहाचे रूप दिले.

मेळाव्यात शिवा संघटनेने समाजासाठी केलेल्या कार्यांचा गौरव करण्यात आला. ओबीसी आरक्षण, धार्मिक स्थळांच्या विकासकामांसाठी मंजुरी, शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, आणि सामाजिक न्यायासाठी सुरू असलेली लढाई या सर्व बाबींवर मनोहर धोंडे सरांनी विस्तृत प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आजपर्यंत संघटनेच्या प्रयत्नांमुळे सात कलेक्टर आणि शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रात पुढे आले आहेत. वीरशैव लिंगायत समाजातील अनेक पोटजातींना आरक्षणाचा लाभ मिळाला असून, समाजाच्या प्रगतीत याचा मोलाचा वाटा आहे.

यावेळी प्रा. मनोहर धोंडे सरांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे काही मागण्यांसाठी लवकरच भव्य आंदोलन उभारण्याची घोषणा केली. समाजाच्या प्रश्नांवर ठोस लढा देण्याचा निर्धार त्यांनी उपस्थित मावळ्यांसमोर व्यक्त केला. तसेच, समाजाने आपली ताकद ओळखून एकसंघ राहण्याचे आवाहनही केले.

मेळाव्यात मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ‘शिवा पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. विविध मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे करत समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. गुरुवर्यांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत आप्पा शेटे आणि दत्ता भाऊ खंकरे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय कोठाळे सर यांनी केले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.

कपिलधार परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. शिवा मावळ्यांच्या घोषणांनी, पारंपरिक वेशभूषेने आणि संघटनेच्या झेंड्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. शिवा संघटनेच्या या मेळाव्याने समाजातील ऐक्य आणि जागरूकतेचा नवा अध्याय लिहिला आहे.


Protected Content

Play sound