मुंबई प्रतिनिधी | आजवर अनेकदा प्रयत्न करूनही शिवसेनेला जे जमले नाही तर आज दादरा, नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी करून दाखविले. कलाबेन यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय संपादन केला असून महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेला पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने हा विजय ऐतिहासीक मानला जात आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि कॉंग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली. यात कलाबेन डेलकर यांनी ४७ हजार ४३७ मतांची निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित झाला आहे.
३० ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत ७५.९१ टक्के मतदान ३३३ मतदान केंद्रांवर पार पडले. भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत, गुलाबराव पाटील यांनी प्रचारात सहभाग घेतला.
दादरा, नगर, हवेली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या कलाबेन डेलकर यांनी दणदणीत विजय संपादन केला असून हा ऐतिहासीक विजय मानला जात आहे. शिवसेनेने आधी देखील महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये नशिब आजमावले असले तरी मात्र अद्याप यश मिळाले नव्हते. मात्र आता महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच पक्षाला यश मिळाल्याने शिवसेनेचा उत्साह दुणावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.