नवीदिल्ली, वृत्तसंस्था | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज (दि.२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शरद पवार नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. संसदेत दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास ही भेट होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तापेच अद्यापही सुटला नसून वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे या बैठकीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे. या भेटीमुळे शिवसेनेची घालमेल प्रचंड वाढली आहे.
“राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोथे नुकसान सहन करावे लागत आहे. शरद पवार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणार आहेत,” अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरातही पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शरद पवार यांनी १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानाची माहिती शरद पवार केंद्र सरकार आणि संबंधित मंत्र्यांना देणार असून लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणार आहेत.
आधी कौतुक ; नंतर भेट
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत बोलताना शरद पवार यांचे कौतूक केले होते. राज्यसभेच्या २५० व्या ऐतिहासिक अधिवेशनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले. त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या या प्रशंसेवर प्रतिक्रिया दिली होती. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केले होते.
नरेंद्र मोदींनी भाजपाचं कौतुक केल्याने अनेकांनी याचा संबंध महाऱाष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी जोडला होता. यावर बोलताना शरद पवारांनी सांगितलं की, “राज्यसभेच्या महत्त्वावर चर्चा करण्यात आली. यावर मोदींनी भाष्य केलं. राज्यसभेत बोलताना मी एकदा सांगितलं होतं की, मी गेली ५२ वर्ष विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभेत आहे. मी कधीही माझ्या जागेवरुन उठून वेलमध्ये गेलेलो नाही. आपला जो काही मुद्दा आहे तो जागेवर उभा राहून मांडला पाहिजे. सभागृहाचा मान ठेवला पाहिजे असं मी म्हटलं होतं. नरेंद्र मोदींना माझ्या त्या वक्तव्याचा आधार घेत राज्यसभेत कौतुक केलं आहे”.