मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीसाठी दुसर्या उमेदवाराची घोषणा करत कोल्हापूरचे निष्ठावंत शिवसैनिक संजय पवार यांना तिकिट देणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना तिकिट देण्यात येणार असल्याची खुली ऑफर शिवसेनेतर्फे त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. यामुळे दुसर्या जागेसाठी कुणाला तिकिट मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमिवर, आज खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या दुसर्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. संजय पवार हे शिवसेनेचे निष्ठावंत नेते असून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख आहेत.
संजय पवार यांना तिकिट मिळणार असल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू झाल्यानंतर सायंकाळी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावर पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, राऊत यांनी माझ्या नावाची घोषणा केली याचा मला खूप आनंद झालेला आहे, जो शिवसैनिक तीस वर्षापासून अखंड कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात काम करतोय , जो पंधरा वर्ष नगरसेवक आहे, चौदा वर्ष जिल्हा प्रमुख आहे, शहर प्रमुख होता, जो सर्वसामान्य शाखा प्रमुखापासून इथपर्यंत पोहचला असं कोणत्या पक्षात होतं, हे फक्त शिवसेनेत होतं, म्हणून शिवसेनेला सलाम, ज्यांनी लोकांनी मला संधी दिली त्यांचे आभार, असे ते म्हणाले आहेत.