मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज अधिकृत प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे.
यासोबतच आणखी सहा प्रमुख नेत्यांनाही प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात अॅड. अनिल परब, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, जनसंपर्क प्रमुख अॅड. हर्षल प्रधान, उपनेत्या सुषमा अंधारे, आनंद दुबे आणि जयश्री शेळके यांचा समावेश आहे.
या नियुक्त्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आल्या आहेत. पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, हे सर्व प्रवक्ते प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेच्या सेंट्रल ऑफिसमधून जारी करण्यात आलेल्या पत्रकात, “सर्व नेते हे उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडत असतात,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांच्यासारखे नेतेही, जरी अधिकृत प्रवक्त्यांमध्ये त्यांची नावे नसली, तरीही तेही माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडू शकतात, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.