राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिध्द करण्याचे पत्र पाठविल्याच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यानंतर सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे सरकारला उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वेगळ्या गटासोबत ३९ आमदार असल्याने सरकारने बहुमत गमावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समजल्याने बहुमत सिध्द करणे गरजेचे असल्याचे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना या निर्णयावर टीका केली. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून यावर ११ जुलै ही तारीख दिलेली आहे. याआधीच बहुमत सिध्द करायला सांगणे हे चुकीचे असल्याचे आमचे मत आहे. यामुळे आम्ही या निर्णयाच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Protected Content