संभाजीनगर नामांतराविषयी शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी- दरेकर

पुणे । जानेवारी – संभाजीनगरच्या नामांतराला कॉग्रेसचा ठाम विरोध आहे. तर शिवसेना या विषयावरुन कोणतीही ठाम भूमिका घेत नसून त्यांची भूमिका सध्या दुटप्पी व धरसोड स्वरुपाची आहे, त्यामुळे संभाजीनगर नामांतराविषयी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.  

पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी मधील कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे, तर कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही इशारा दिला आहे की, सरकार आमच्यामुळेच आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार हा विषय आमच्या अजेंडावर कधीच नव्हता. त्यामुळे शिवसेनेला सत्तेची लाचारी हवी की, अस्मिता हवी हे शिवसेनेने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. 

शिवसेना नेते संजय राऊत सांगत आहेत की हा विषय आम्ही मिटवू तर त्याचवेळी शिवसनेचे चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरच्या नामांतराला कोणी विरोध केल्यास जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका घेत आहेत, पण ती कितपत खरी आहे, शिवसेनेचे आमदार आंबदास दानवे यांनीही या विषयावर नरो व कुंज रोवाची भूमिका घेत आहेत. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की,  या सर्व विषयाबाबतीत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि  राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपली काय भूमिका आहे हे राज्यातील जनतेला स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

इडी ही स्वायत्त संस्था आहे. संविधानाने या लोकशाहीमध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रकार  दुर्दैवाने गेल्या काही महिन्यात राज्यात सुरु आहे. केंद्र सरकारला मानत नाही, सुप्रीम कोर्टाला मानत नाही आणि इडी कारवाईच्या विरोधात रस्त्यावर उतरू अश्या प्रकारचे अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचं प्रयत्न चालू आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे. एकनाथ खडसे यांनी सांगितले होते माझी इडीची चौकशी झाल्यास मी सीडी काढतो. पण मला वाटते की फक्त धमक्या, भूलथापा देण्याचं काम सुरु आहे. पुण्यात परवा अनिल देशमुख येऊन गेले, कॉल सेंटरचे उदघाटन करुन गेले, पण त्यानंतर गुन्हेगारी घटना घडली, याचाच अर्थ गृहमंत्री स्वत: पुण्यात येऊनही जर त्यांचा धाक, दरारा व पोलिसांचा अंकुश नसेल तर सुरक्षेच्यादृष्टीने राज्य खास करून पुणे सुरक्षित आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Protected Content