नगरदेवळ्यात शिवसेनेला हादरा; २५ वर्षानंतर सत्तात्तंर होवुन भाजपाला यश

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यात ९६ पैकी ८४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या. निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यात २१७ सदस्य बिनविरोध निवडुण आले होते. उर्वरित ६२७ सदस्यांसाठी १ हजार ४०४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.  पाचोरा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या नगरदेवळा येथे २५ वर्षांपासून शिवसेनेकडे एक हाती सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत १७ पैकी १० तर शिवसेनेला ७ जागा मिळुन शिवसेनेला व जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या गावात त्यांना भाजपाने हादरा दिला. 

आजी – माजी आमदारांच्या गावातील सत्ता अबाधित ठेवत पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या अंतुर्ली बु”. प्र. पा. गावी निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी त्यांच्या पॅनलच्या ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरित ३ जागांची निवडणूक झाल्याने या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रेणित तिनही जागांवर विजयश्री मिळाला. तर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या बांबरुड (राणीचे) गावात वाघ घराण्याकडे गेल्या ३५ वर्षांपासून एक हाती सत्ता होती. या निवडणुकीत १५ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ३ जागा शिवसेना व १ जागा भाजपाला गेल्याने वाघांनी पुन्हा गावात वर्चस्व कायम ठेवले. 

पाचोरा तालुक्यात ९६ पैकी ८४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या. निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यात २१७ सदस्य बिनविरोध निवडुण आले होते. उर्वरित ६२७ सदस्यांसाठी १ हजार ४०४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दि. १८ रोजी सकाळी १० मिनिटांनी सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे मतमोजणीस तहसिलदार कैलास चावडे, निवडणूक नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, बी. डी. पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली १७ टेबलवर मतमोजणी सुरू झाली.

यावेळी पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, दत्तात्रय नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांचेसह पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

तालुक्यातील लोकसंख्ये मानाने दुसऱ्या क्रमांकावर असलेले पिंपळगाव (हरे.) येथे गेल्या १० वर्षांपासून सुखदेव गिते यांच्या कडे सत्ता होती या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने महाआघाडी करुन निवडणूक लढविल्याने महाआघाडी ला १७ पैकी १३ तर भाजपा प्रेणित डॉ. शांतीलाल तेली यांना केवळ ४ जागा राखता आल्या. तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या लोहारा गावात अक्षयकुमार जैस्वाल यांच्या हातात १५ वर्षांपासून सत्ता होती. वर्षभरापूर्वी त्यांच्या पॅनलचे एक सदस्य मयत झाल्याने व एक सदस्य अपात्र झाल्याने सत्ता परिवर्तन होवुन भाजपाचे कैलास चौधरी यांचेकडे सत्ता गेली. या निवडणुकीत अक्षयकुमार जैस्वाल यांच्या महाविकास आघाडीला १७ पैकी ९ तर भाजपाचे कैलास चौधरी यांच्या पॅनलला ८ जागा मिळाल्या. या निवडणुक कामी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय्य सहाय्यक गणेश गोसावी यांनी लक्ष दिले होते. कुऱ्हाड खु” येथे सदस्यांनी अतिक्रमण केल्याने विरोधकांनी आक्षेप घेवुन न्यायालया मार्फत सर्व सदस्यांना पदावरुन पाय उतार व्हावे लागल्याने गेल्या ४ वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या गावातील शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण रुपचंद पाटील यांच्या शिवसेना प्रेणित पॅनलला १३ पैकी ८ जागा तर भाजपा प्रेणित व रेशनिंग वितरक हमाल मापाडी संस्थेमुळे जिल्हाभर गाजलेल्या जगदिश तेली यांच्या पॅनलला ५ जागा मिळवता आल्या. जारगाव येथे रेशनिंग संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील यांच्या पॅनलला ९ पैकी ८ जागा तर माजी सरपंच प्रविण पाटील यांच्या भाजपा प्रेणित पॅनलला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले.

खडकदेवळा खुर्द येथे ९ जागांपैकी महाविकास आघाडीच्या ८ निवडून आले तर एक जागावर समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीने ९ पैकी ९ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. तारखेडा बु” येथील जिल्हा परिषद सदस्य डी एम पाटील हे ९ पैकी एक जागा बिनविरोध तर ८जागा निवडून आणण्यास यशस्वी झाले प्रतिस्पर्धी उमेदवार माजी सरपंच आर आर पाटील यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही, नाचणखेडा येथे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष हिम्मतसिंग निकुंभ यांनी ९ पैकी ७ जागा जिंकुन गड राखला तर शिवसेनेचे धर्मेंद्रसिंग पाटील यांच्या पॅनलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले.  निपाणे येथील जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या पॅनलच्या या पुर्वीच ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित ४ ही जागांवर त्यांनी विजयश्री खेचून आणला. नांद्रा येथे माजी सरपंच शिवाजी तावडे यांच्या पॅनलला ४, योगेश सुर्यवंशी यांच्या पॅनलला ४ तर विनोद तावडे यांच्या पॅनलला ३ जागा मिळाल्या आहेत.  कुरंगी येथे ११ पैकी भाजपा प्रेणित योगेश पाटील यांच्या पॅनलला ७ तर गजानन पवार यांच्या पॅनलला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले.

शिंदाड येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील पराभूत

येथील माजी सरपंच व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय शरद पाटील हे नवखा उमेदवार संदिप सराफ यांचे समोर सुमारे २०० मतांनी पराभूत झाले असुन त्यांच्या शिवसेना प्रेणित पॅनलला १५ पैकी ४ तर बाजार समितीचे संचालक नरेंद्र पाटील यांच्या भाजपा प्रेणित पॅनलला १० जागांवर विजयश्री मिळाली आहे.

जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत यांच्या पॅनलचा धुव्वा

कासमपुरा येथील जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत यांच्या शिवसेना प्रेणित पॅनलचा धुव्वा उडाला असुन भाजपा प्रेणित सतिष राजपुत (गवळी) यांच्या पॅनलला ९ पैकी ९ जागा निवडून आल्या आहेत. त्याप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल रामदास पाटील यांच्या परधाडे गावात त्यांच्या पत्नी सह ७ पैकी ६ उमेदवार पराभूत झाले.

भोजे, खडदेवळा खु”, टाकळी बु” व नाचणखेडा येथे ईश्वर चिठ्ठीद्वारे उमेदवार विजयी

पाचोरा तालुक्यातील भोजे येथे उज्वला धनराज पवार व संजीवनी सुखदेव गोंधळे यांना २४० अशी सारखी मते मिळाल्याने ईश्रर चिठ्ठीद्वारे उज्वला धनराज पवार ह्या विजयी झाल्या. खडकदेवळा खु” येथे शोभाबाई धनलाल तेली व संगिता संभाजी बनसोड यांना २०९ अशी  समान मते मिळाल्याने ४ वर्ष वयाच्या अनु संजय ठाकुर या बालिकेने शोभाबाई धनलाल तेली यांच्या नावाची ईश्र्वर चिठ्ठी काढली. टाकळी येथे अर्चना रविंद्र पाटील व चंद्रकलाबाई जयराम शेळके यांना १०७ समान मते मिळाली मात्र ईश्वर चिठ्ठीद्वारे अर्चना रविंद्र पाटील ह्या विजयी ठरल्या. नाचणखेडा येथे करणसिंग लोटन पाटील व दिलीप बाबुलाल पाटील यांना १२२ अशी समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढुन करणसिंग लोटन पाटील हे विजयी ठरले. चारही ग्रामपंचायतीतील ईश्वर चिठ्ठी ही ४ वर्षीय अनु संजय ठाकुर या चिमुकलीने काढली.

 

Protected Content