सांगवी प्र. लो. येथील महिला घरकुल योजनेपासून वंचित; महिलेचा ग्रामपंचायत विरोधात तक्रार अर्ज

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सांगवी प्र. लो. ग्रामपंचायतमध्ये घरकुलसाठी माझी जागा मंजूर झालेली असतांना ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ करण्यात येत असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी होवून न्याय मिळावा अशा आशयाचा तक्रार अर्ज रेखा कांबळे यांनी केला आहे.

यात “तालुक्यातील सांगवी प्र. लो. येथील रहिवाशी रेखा सुरेश कांबळे यांचे घरकुल मंजूर झाले असून घरकुलासाठी वरिष्ठ पातळीवरुन जागा देखील मंजूर झाली आहे. सांगवी प्र. लो. येथे मागील काळात काही लोकांना ग्रामपंचायतीने जागा देऊन घरकुल बांधून दिल्या आहेत. मात्र रेखा कांबळे या मातंग समाजातील मागासवर्गीय परीतक्ता तसेच बेघर असून देखील त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक काही कारण नसतांना या प्रकरणी विलंब करत आहेत. रेखा कांबळे या अनेक वेळा सांगवी प्र. लो. ग्रामपंचायतमध्ये जाऊन ‘माझी जागा मंजूर झालेली आहे.’ असं सांगूनसुद्धा ‘ठराव होऊ द्या. झाल्यानंतर बघू.’ अशा पद्धतीचे ग्रामपंचायतीकडून उत्तर देऊन टाळाटाळ करण्यात येत आहे.

या प्रकरणाची तात्काळ चौकशी होवून न्याय मिळावा.” अशा आशयाचा तक्रारी अर्ज रेखा कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिला आहे. तसेच अर्जाची प्रत जिल्हाधिकारी, जळगांव यांना पाठविण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content