सत्तेसाठी शिवसेनेने सोडला ‘मातोश्री’वर भेटींचा हट्ट

ashish shelar

मुंबई, वृत्तसंस्था |“राज्यामध्ये तिन्ही पक्षांचे सुरु असलेले नाटक महाराष्ट्राला अमान्य आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. ‘मातोश्री’ऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका सुरु आहेत,” असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच “आधी परिवाराचे सदस्य असणाऱ्या राज ठाकरेंना मातोश्रीवरुन कोणी भेटायला जात नसे आणि आज अगदी माणिकराव ठाकरेंनाही भेटायला लोक मातोश्रीतून बाहेर जाताना दिसतात,”असेही शेलार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकींवर टीका करताना म्हणाले.

 

राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून तीन आठवडे झाल्यानंतरही सत्तेस्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका मुंबईमधील रिट्रीट आणि ट्रायडण्टसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु आहेत. किमान समान कार्यक्रमावर एकमत होण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मात्र यासाठी सुरु असणाऱ्या बैठकींवरुन शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. पुर्वी महाराष्ट्रातील नेते मातोश्रीवर चर्चेसाठी जायचे आणि आता उलटे चित्र महाराष्ट्राला दिसत आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

“महाराष्ट्राने पाहिले की, मातोश्रीचा सन्मान ठेवत, बाळासाहेबांच्या प्रती आदर ठेऊन भाजपाचे सर्वोच्च नेते हे मातोश्रीवर राजनैतिक चर्चा करायला जायचे, अन्य पक्षाचे नेतेही जायचे. आज सत्तेच्या लालसेपोटी मातोश्रीवरुन सर्वजण बाहेर पडून पंचातारांकित हॉटेलची वारी करताना आपण बघत आहोत. पूर्वी तर महाराष्ट्राने हे ही पाहिले की, मातोश्रीवरुन कोणी अगदी परिवारातील राज ठाकरेंनाही भेटायला जात नव्हते. आज महाराष्ट्र काय पाहतोय की, मातोश्रीवरुन निघून राज ठाकरे तर सोडा माणिकराव ठाकरेंना भेटायला सुद्धा लोक जाताहेत,” असेही शेलार शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेताना म्हणाले.

वयासोबत परिपक्वता वाढावी, असा टोला लगावत शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना वाढदिवसानिमित्त खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी त्यांनी केला. मंदिराची शपथ घेऊन असत्य पसरवणे मान्य नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. शिवसेनेचा मोदींबद्दल आदर स्वाथी की नि:स्वार्थी ? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.

Protected Content