मुंबई प्रतिनिधी । शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ नायगाव पडोळी गावात खासदार ओमराजे आले होते. यावेळी रस्त्यावरून चालत जात असताना ते ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत होते. यावेळी एका तरुणाने हस्तांदोलनासाठी एका हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने ओमराजेंवर चाकूहल्ला केला. ओमराजेंच्या पोटावर झालेला वार हातावर आणि मनगटावर त्यांनी झेलला. हातातील घडयाळवर चाकूचा वार बसल्याने खासदार जखमी झाले असून यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, परंतु तोपर्यंत हल्लेखोर तरूण पळून जाण्यात यशस्वी झाला.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी मी सुखरूप असून सुदैवाने जखम खोल नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याची विनंती केली आहे.