मुंबई (वृत्तसंस्था) सत्तेचे समान वाटप होणार असे ठरले होते. त्यात मुख्यमंत्रिपद येत नाही का? मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एवढेच नाही तर आम्ही नरमाईची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. युती असल्याने चर्चा होऊ शकते. त्यामुळे यात नरमाईचे काहीही धोरण नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
समान सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत सुरू असलेले युद्ध आणखी पेटू लागले आहे. मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेता निवडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे मांडली. दिलेला शब्द पाळायाचा ही आम्हाला बाळासाहेबांकडून मिळालेली शिकवण आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले. अमित शाह यांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद पार पडली होती त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समसमान फॉर्म्युला असेल हे म्हटले होते. आमचीही तेवढी एकच मागणी आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना आमच्यासोबत येणार नसेल तर आम्हाला पर्याय खुले आहेत असे जर भाजपा म्हणू शकते तर तो हक्क आम्हालाही आहे. मात्र उद्धव ठाकरे हे पाप करणार नाहीत तसे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.