मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा खेळ आता आणखी बिकट होत चालला आहे. शिवसेना दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आणि बहुमतासाठी अन्य पक्षांचे समर्थनाचे पत्र देण्यास अपयशी ठरल्याचे राज्यपालांकडून अधिकृतरीत्या नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांना आपण मुदत वाढवून दिली नसल्याचेही त्यांनी यासंबंधी पत्रकारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.
एकीकडे राज्यात या वेगवान घडामोडी घडत असताना काँग्रेसचे राज्यातले ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नवीदिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोघा पक्षांनीही शिवसेनेला अदयाप पाठिंब्याचे पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी दोन्ही पक्ष आणखी काही वेळा चर्चा करून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. एकूणच राज्यात सत्ता स्थापनेचा हा खेळ आणखी काही काळ सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. त्यात बहुमताचे गणित जो पक्ष जमवेल तो सत्ता स्थापन करेल किंवा किमान सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.