मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना-भाजप युतीचे घोडे १० जागांवर अडल्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त टळला असल्याचे वृत्त समोर आले आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकला नव्हता.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते. या चर्चेचा तपशील राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिला जाईल. परंतू आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शाह घेणार आहेत. पक्षांतर बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचे आणखी एक प्रमुख कारण सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षाचे एबी फॉर्म वाटप करताना वाद टाळण्यासाठी युतीच्या घोषणेची घाई नको, अशी रणनीती वरिष्ठ पातळीवर ठरली असल्याचे कळतेय.