Home Cities जळगाव एलपीजी सिलेंडर दरवाढ व तुटवड्याविरोधात शिवसेना आक्रमक ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एलपीजी सिलेंडर दरवाढ व तुटवड्याविरोधात शिवसेना आक्रमक ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात आणि जिल्ह्यात जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडावर डोळ्यावर आणि तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला आहे.

गॅस दरात मोठी वाढ
निवेदनात नमूद केल्यानुसार, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ११५ रुपयांची वाढ झाली आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेला या दरवाढीमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. ही वाढलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

साठेबाजीचा संशय आणि टंचाईचा प्रश्न
जळगाव जिल्ह्यात सध्या गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. काही गॅस वितरक जाणीवपूर्वक सिलिंडरची साठेबाजी करत असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने या साठेबाजांवर कडक कारवाई करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा
“जळगाव जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना विना अडथळा पुरवठा करण्यात यावा. जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही आणि दरवाढ मागे घेतली नाही, तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने आगामी काळात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा प्रमोद घुगे यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound