अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या युवा मित्र परिवाराने यंदाही अमळनेरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भव्य मिरवणूक :
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अमळनेर नगरपरिषद हायस्कूलच्या मैदानातून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. मिरवणुकीत सायरदेवी बोहरा स्कूल आणि न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्ये आणि देखावे सादर केले. रमाई लेझीम महिला पथक, वाडी संस्थेचे बाल भजनी मंडळ आणि जीत स्टुडिओच्या नृत्यांनी मिरवणुकीला विशेष रंगत आणली. भव्य शिवजयंती देखावा आणि बाल शिवाजी सजवलेला ट्रॅक्टर मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.
विविध उपक्रम :
मिरवणुकीदरम्यान विजय मारुती मंदिरात लाडू वाटप करण्यात आले, तर राज लाड, भावेश जैन, सिद्धू चौधरी, योगेंद्र माळी आणि तुषार बाविस्कर यांच्याकडून शितपेय (लस्सी) वाटप करण्यात आले. विजय मारुती मंदिरात मिरवणूक थांबवून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही मिरवणुकीला भेट दिली. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
शिवभंडारा आणि सत्कार :
समापनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांच्या परिवाराच्यावतीने शिवभक्तांसाठी शिवभंडारा आयोजित करण्यात आला होता. रणरणत्या उन्हात जल्लोष करणाऱ्या शिवभक्तांसाठी यावेळी मठ्ठा वाटपही करण्यात आले. शिवजयंती मिरवणुकीत सहभागी कलापथकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे सहकार्य लाभले. सुप्रसिद्ध बिल्डर सरजूसेठ गोकलानी, मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा, आदित्य बिल्डर्सचे प्रशांत निकम, ॲड. दिनेश पाटील, कृउबा संचालक सचिन पाटील आणि भिकेश पाटील यांचे सहकार्य लाभले.