जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. महाविद्यालय परिसरात दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उमाकांत चौधरी, डॉ. सौगदकुमार तायडे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. रूपाली चौधरी, डॉ. चेतनकुमार पाटील, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. साजीया खान, रजिस्ट्रार चेतन चौधरी तसेच मोहित येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

पूजनानंतर महाविद्यालय परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. महाराजांची वेशभूषा महेश मछले यांनी साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेतून शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील कार्य प्रभावीपणे उलगडण्यात आले. आशिष तायडे, श्रुती उमाळे आणि रिद्धी जैस्वाल यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच परिणीता पेठे आणि चेतना शिंदे यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौरभ मराठे, वेदांत चव्हाण आणि नेहल चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन कौस्तुभ वडगावकर आणि रांजली इंगळे यांनी प्रभावीपणे पार पाडले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिवभक्तीचा जोश पाहायला मिळाला.



