Home Cities जळगाव मैत्र महोत्सवात शिरगावच्या कलावंतांनी जिंकली जळगावकर प्रेक्षकांची मने

मैत्र महोत्सवात शिरगावच्या कलावंतांनी जिंकली जळगावकर प्रेक्षकांची मने


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैत्र महोत्सवात कोकणातील शिरगाव येथील कलावंतांनी सादर केलेल्या “आईतवार” या नाटकाने जळगावकर प्रेक्षकांची मने जिंकली. आई–मुलाच्या नात्याचा हृदयस्पर्शी प्रवास उलगडणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरशः अश्रूंनी भारावून टाकले.

डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या दिग्दर्शनाखाली व उद्धव शेळके यांच्या कथेचे नाट्यरूपांतर असलेल्या या प्रयोगात कलावंतांनी अत्यंत सहज, संयत आणि प्रभावी अभिनयातून कथानक जिवंत केले. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सादर झालेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख राहुल गायकवाड, डॉ. शिल्पा बेंडाळे, डी. वाय. पाटील यांच्यासह महोत्सव प्रमुख डॉ. रेखा महाजन, विनोद पाटील, मानसी गगडानी आणि शिरीष बर्वे उपस्थित होते.

यावेळी सोशल मीडियावर एमएच-१९ चॅनेलवर प्रभाव टाकणाऱ्या तीन मित्रांचा विशेष सत्कार करण्यात आला. भूषण राजपूत, हरीश नेरकर आणि आदित्य पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन सुनीला भोलाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलेले यांनी केले.

मैत्र महोत्सवाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने जागेअभावी अनेकांना परत जावे लागले. नाटकानंतर प्रेक्षक व कलावंत यांच्यात झालेल्या संवादातून नाटकातील भावविश्व अधिक खुलले. या भावपूर्ण प्रयोगाने महोत्सवात एक संस्मरणीय ठसा उमटवला.


Protected Content

Play sound