शिर्डीच्या साईबाबा मंदिराला २८७ कोटींच्या देणग्या प्राप्त

saibaba murti

अहमदनगर, वृत्तसंस्था | शिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोन कोटींची वाढ झाली आहे. यंदा साईचरणी तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले असून ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या देणग्यांमध्येही लक्षणीय वाढ आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साईचरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

 

साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साई संस्थानचे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे असते. परंतु अनेकांना जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता असते. गेल्या कॅलेंडर वर्षाचा विचार केल्यास २०१८ मध्ये साईचरणी २८५ कोटी रुपयांचे दान आले होते. यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून २०१९ मध्ये साईबाबांच्या चरणी २८७ कोटी ६ लाख ८५ हजार ४१५ रुपये दान आले आहेत. याशिवाय यावर्षी १९ किलो सोने आणि तब्बल ३९१ किलो चांदीही प्राप्त झाली आहे.

Protected Content