शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती ! : आदित्य ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची कुणकुण लागताच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिली असतांना त्यांनी बंड कसे केले ? असा सवाल आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

 

आदित्य ठाकरे यांनी आज युवासेनेच्या राष्ट्रीय बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना पक्षाने काहीही कमी केले नाही. त्यांच्यासाठी हवे ते केले. त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पदे दिलीत. मात्र त्यांची याची अतिशय कृतज्ञपणे परतफेड केली. गेल्या महिन्यात २० मे रोजी उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांना बोलावून त्यांना मुख्यमंत्रीपद हवे असल्यास त्यांनी घ्यावे अशी ऑफर देखील त्यांना दिली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

 

आदित्य ठाकरे यांनी याप्रसंगी जोरदार टीकास्त्र सोडत बंडखोरांवरही शरसंधान केले. ते म्हणाले की, आसाममध्ये पुरस्थिती गंभीर असतांना ही मंडळी तेथील पंचतारांकीत पाहुणचार घेत असल्याची बाब अतिशय घृणास्पद अशीच आहे. शिवसेना ही लढणारी असून आम्ही आगामी काळात देखील संघर्ष करतच राहू अशी भूमिका त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Protected Content