मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक समीप येत असताना सत्ताधारी महायुतीत अंतर्गत नाराजीचा भडका उडाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांनी अचानक अनुपस्थित राहून अघोषित बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बैठकीनंतर हे सर्व मंत्री थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात दाखल झाले असून तिथे तातडीची बैठकीला सुरुवात झाली आहे.
शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीला सर्व मंत्री हजर होते, मात्र त्यानंतर काही मिनिटांतच झालेल्या मुख्य मंत्रिमंडळ बैठकीला यापैकी एकही मंत्री गेला नाही. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बैठकीत उपस्थित राहिले. शिवसेना मंत्र्यांनी हा सामूहिक बहिष्कार टाकल्यानंतर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर राजकीय तापमान चढले आहे.

या नाराजीचा मूलभूत उगम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांभोवती सुरू झालेल्या ‘फोडाफोडी’त असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित होते. भाजपने अनेक दिवसांपासून श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावल्याचे समोर आले आहे. ठाणे, पालघर, कोकण, अंबरनाथ आणि कल्याण परिसरातही अशाच प्रकारे शिवसेना गटातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेतल्याने नाराजी तीव्र झाली आहे.
शिंदे गटाचे आरोप असे की, युतीचा धर्म पाळला जात नाही, ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या त्यांनाच भाजप पक्षात घेत आहे, आणि पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता निधीवाटप व निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे मंत्री आणि स्थानिक पातळीवरील नेते प्रचंड नाराज झाले आहेत. काही मंत्र्यांचे म्हणणे आहे की, स्वतःच्या मतदारसंघासाठी निधी आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांमध्ये उदय सामंत, प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात धाव घेतल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचे जाणवते.
या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीसाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.



