महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे जळगावकर त्रस्त; मनसेचा आंदोलनाचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील हजारो वीज ग्राहकांना गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रिडिंगची तारीख २५ वरून २२ वर आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चुकीची बिले, वाढीव रकमांचे बिल, विलंब शुल्क आणि ऑनलाइन रिडिंग सबमिट करणाऱ्या ग्राहकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तातडीने पुढाकार घेत महावितरणकडे लिखित निवेदन सादर केले.

महावितरणकडून अचानक केलेल्या तारखाबदलामुळे महिन्याचे कमीतकमी युनिट वापर मोजण्याऐवजी अधिक दिवसांचा वापर बिलात जमा होत आहे. त्यामुळे ग्राहकांचे बिल अनाठायी वाढत आहे. विशेषतः स्वयंचलितपणे ऑनलाइन रिडिंग देणाऱ्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना सिस्टममधील तारीख बदलामुळे चुकीचे युनिट नोंदवले जात असल्याची तक्रार येत आहे. ग्राहकांना रिडिंग जुळत नसल्याने कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

आज मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालयात भेट देत या तक्रारींचा तपशीलवार आढावा देणारे निवेदन सादर केले. बदललेल्या तारखेचा आर्थिक फटका, चुकीच्या रिडिंगवर लावला जाणारा दंड, विलंब शुल्क, तसेच तक्रार निवारणाच्या प्रक्रियेत ग्राहकांची होणारी मानसिक व आर्थिक दमछाक याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला. प्रत्येक महिन्यात अचानक वाढणाऱ्या बिलांमुळे ग्राहकांत तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनानंतर महावितरणने तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले असले तरी मनसेने अधिक ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. बदललेल्या तारखेची माहिती एसएमएसद्वारे, वेबसाइटवर आणि मराठी भाषेत स्पष्टरीत्या देण्यात यावी, चुकीच्या बिलांवरील दंड पूर्णपणे माफ करण्यात यावेत आणि भविष्यात रिडिंगच्या तारखेत कोणताही बदल करण्यापूर्वी किमान १५ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे, अशी मनसेची ठाम भूमिका आहे.

मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, महावितरणने ग्राहकहिताच्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे तातडीने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष न दिल्यास पक्ष आक्रमक आंदोलन छेडण्यास भाग पडेल. शहरातील सामान्य नागरिकांची लूट सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना रज्जाक सय्यद, विद्यार्थी सेना योगेश पाटील, विकास पाथरे, ॲड. सागर शिंपी, महिला सेना अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.