मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सर्वच आघाड्यांवर मागे पडणार्या उध्दव ठाकरे यांना शिंदे गटाने धक्का देत विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयावर देखील ताबा मिळविला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक गतीमान घडामोडी घडत आहेत. यात, आज शिंदे गटाने थेट विधीमंडळातील कार्यालयावर ताबा मिळविला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले.
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की, आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे. यामुळे आता शिंदे गट थेट शिवसेना भवनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता बळावली आहे. या संदर्भात लवकरच गतीमान घडामोडी होऊ शकतात.