भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील मांडवेदिगर व भिलमळी या गावातील शेतकऱ्यांना त्यांची शेती सरकार जमा केल्यासंबंधी अचानक नोटीस मिळल्याने संपात व्यक्त केला जात आहे. साधारण १२०० हेक्टर जमीन सरकार जमा होत असून साधारण १ हजार शेतकरी प्रभावित होणार असल्याचे कळते. विशेष म्हणजे १९३२ पासून संबंधित शेतकरी जमीन वंश परंपरागतरित्या कसत असल्याचे कळते.
भुसावळ उपविभागीय अधिकारी डॉ. कुमार चिंचकर यांच्याकडून महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ मधील कलम २५७ अन्वये कामकाज निकालपत्रद्वारे शेतकऱ्यांच्या नावाने फेरफार नोंदी पुनर्रलोकनात घेवून रद्द करण्यासंबंधी नोटीस देण्यात आली असून, आदेश मान्य नसल्यास ६० दिवसाच्या आत अपील दाखल करता येणार असल्याचे सांगितले आहे.
आदेशामध्ये म्हटले आहे की, जमिनीचे हस्तांतातरण हे सक्षम प्रांताधिकारी यांची पुर्व परवानगी घेण्यात आलेली नसल्याने सरकार जमा करण्याबाबत म्हटले आहे. तसेच या जमीनी देवस्थान ईनाम वर्ग ३ असल्याचेही म्हटले आहे. जवळपास मांडवेदिगर, भिलमळी या ठिकाणी १२०० हेक्टर जमीनीबाबत सरकार जमा करण्याचे आदेश असून आठशे ते एक हजार कुटुंब या शेतजमीनीवर निर्भर असून 5 ते 7 हजार लोकसंख्या यामुळे प्रभावित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याविषयी अधिक माहिती घेतली असता येथील जमीन सन १९३२ पासून ती जमीन बंजारा समाजाच्या शेतकऱ्यांनी खरेदी करून विकत घेतलीय. ती जमीन ते शेतकरी कसत असून तेव्हापासुन शेतसार भरत आहेत. तसेच त्या जमीनीचे तेव्हापासुन दुय्यम निंबंधाकाकडे खरेदी विक्री व्यवहारासह वारसा हक्काने नावे उताऱ्यावर २०१८ पर्यंत लागत होते. अशा प्रकारे वंश परंपरागत वहिवाट करीत असलेल्या मांडवेदिगर, भिलमळी येथील जवळपास सर्व शेतकऱ्यांना अचानक नोटीस मिळाल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.