जळगाव प्रतिनिधी । शासनाने सन 2019-20 या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ देण्याकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आला आहे.
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परीस्थिती निर्माण होते. अशा कारणांनी अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख, अपघातामुळे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय तसेच 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 2 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय होते. अपघातमुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. एक लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील.
या योजनेत जळगाव जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार, शेतकरी व विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोण्तीही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकुण 2 जणांकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.