शेंदुर्णी, ता. जामनेर, विलास अहिरे | एकीकडे समाजात दुहीच्या अनेक घटना घडत असतांना येथे शांतता समितीच्या बैठकीत एक स्तुत्य निर्णय घेण्यात आला.
शेंदुर्णी नगरी ही प्रती पंढरपूर म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. येथील भगवान त्रिविक्रम रुपात साक्षात पंढरपूरचे विठ्ठलाचे दर्शन घडते अशी श्रद्धा असून ज्यांना पंढरपूर वारीत सहभागी होता येत नाही असे भाविक शेंदुर्णी येथील भगवान त्रिविक्रम मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होतात. गेल्या २७५ वर्षापासून येथे आषाढी एकादशीचे दिवशी भाविकांची मोठी गर्दी येथे उसळले. अलीकडच्या वर्षांचा विचार केला असता आषाढीला किमान ५० हजार नागरिक दर्शनाला येतात. यासोबत पंचक्रोशीतून ५० /६० दिंड्या येतात.
दरम्यान, यंदा आषाढी एकादशीच्याच दिवशी बकरी ईद येत आहे. या पार्श्वभूमिवर येथील मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन बकरी ईद ही रविवारी साजरी करण्यात येत असली तरी बकर्याची कुर्बानी रविवार ऐवजी सोमवारी करण्याचा निर्णय घेतल्याचे मुस्लिम समाजाचे नेते जावा शेठ बागवान यांनी शांतता समितीचे बैठकीत जाहीर केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप इंगळे होते. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
दरम्यान, प्रताप इंगळे यांनी आषाढी एकादशी व बकरी ईदच्या सणाचे महत्त्व सांगून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किमान पोलीस अधिकारी, पोलीस,महीला पोलीस,होमगार्ड असे १०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यात मंगळ सूत्र, सोन साखळी चोरांवर विशेष पोलिसांकडून नजर ठेवली जाणार असल्याचे सांगितले भाविकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे तसेच दिवसभर अखंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी विद्युत मंडळाकडून दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगितले. आषाढीच्या दिवशी गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच मंदिर सजावट येथील नगर पंचायत कडून करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी तसेच भाजप नेते गोविंद अग्रवाल यांनी सांगीतले.
यावेळी माजी सरपंच सागरमल जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाजप नेते पंडितराव जोहरे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला माजी सरपंच सागरमल जैन,शांताराम गुजर,माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल,पंडितराव जोहरे,नगर सेवक शरद बारी, भगवान त्रिविक्रम मंदिर ट्रस्टी भूषण भोपे, हभप कडोबा माळी, पंकज गुजर, संजय सूर्यवंशी, पिंटू काझी, रवींद्र गुजर, जोगेश्वर अग्रवाल यांच्यासह शांतता समिती सदस्य, पत्रकार, ए एस आय शशिकांत पाटील, पोहेका प्रशांत विरनारे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते .शेवटी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान, शेंदुर्णी येथील मुस्लीम समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.