शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक राजश्री तुळशीराम पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील फ्लॉरेन्स नाइटिंगेल आदर्श परिचारिका पुरस्कार जाहीर झाला आहे.
शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक राजश्री तुळशीराम पाटील यांना आदर्श परिचारिका पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंदर्भात त्यांना केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या नर्सिंग कौन्सिल विभागाचे पत्र मिळाले आहे. लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
विश्वविख्यात परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या नावाने दरवर्षी देशभरातील आपल्या कर्तव्यात उत्तम कामगिरी करणार्या मोजक्या परिचारिकांना या पुरस्काराने गौरवले जाते. राजश्री पाटील या मूळच्या पहूर येथील रहिवासी भिलखेडा (ता.जामनेर) येथील सासर आहे. त्यांचे पती शेतकरी असून, त्यांना एक मुलगी आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे त्या १९९८ साली आरोग्यसेवेत रूजू झाल्या २०१२ पासून त्या शेंदर्णी येथे कार्यरत आहेत. त्यांनी सुमारे साडेतीनशे महिलांची सुखरूप प्रसुती केली असून हा एक विक्रम मानला जातो. यासोबत त्यांच्या कार्यकाळात शेंदुर्णी आरोग्य केंद्राला तीनवेळा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार, दोनवेळा कायाकल्प पुरस्कार व आयएसओ दर्जा मिळाला आहे. रूग्णसेवेसाठी कायम तत्पर असणार्या परिचारीका म्हणून त्यांचा लौकीक असून याचमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
दरम्यान, राजश्री पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. शेंदुर्णी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल सोनार, डॉ. राहुल निकम, डॉ.पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्तम कामगिरी केली असून या पुरस्काराने त्यांच्या कार्याचा यथोचीत गौरव होणार असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गरुड, जिल्हा परिषद सदस्य सरोजिनी गरुड, नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष नीलेश थोरात, गोविंद अग्रवाल, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, नाना माळी यांनी यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.