

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विदर्भाची ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावमध्ये उद्या संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रगट दिन उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी आजपासूनच शेगावमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण दाखल होत असून, राज्यभरातून हजारो दिंड्या शेगावमध्ये पोहोचल्या आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने शिस्तबद्ध व्यवस्थापन करण्यात आले आहे. मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले राहणार असून, भाविकांसाठी राहण्याची, भोजनाची आणि वाहतुकीचीही विशेष सोय करण्यात आली आहे.

शेगावमध्ये जय्यत तयारी!
आज संपूर्ण शेगाव शहर संत गजानन महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले असून, उत्साहाचे वातावरण आहे. शिस्तबद्ध दर्शन रांगांची व्यवस्था, विशेष सुरक्षा उपाय, वाहतूक नियंत्रण, तसेच दिंड्यांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था याकडे संस्थानचे विशेष लक्ष आहे.
शेगावमधील या महान उत्सवाचे थेट दृश्य आणि तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी ‘लाईव्ह ट्रेड न्यूज’च्या माध्यमातून घेतला आहे. उद्या प्रगट दिनानिमित्त शेकडो भाविक महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. संत गजानन महाराजांचा जयघोष, दिंड्यांची वारी आणि भक्तीमय वातावरण यामुळे शेगावमध्ये भक्तिरसात न्हालेल्या प्रगट दिन सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


