शेअर बाजारात गुंतवणूकदारांना तब्बल २.७३ लाख कोटींचा नफा

sensex

मुंबई वृत्तसंस्था । शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या सुटीनंतर मंगळवारी उघडलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीपासून समभागखरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स उसळत गेला. दिवसभरात ५८१ अंकांनी वधारलेल्या सेन्सेक्सने दिवसअखेरीस ३९८३१चा स्तर गाठला. तर, १५९ अंकांची वाढ साधलेला निफ्टी ११७८६वर स्थिरावला. सेन्सेक्सच्या या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात तब्बल २.७३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

दिवाळीनिमित्त रविवारी संध्याकाळी शेअर बाजारात विशेष मुहूर्त ठेवण्यात आला होता. तासाभराच्या या मुहूर्तादरम्यान सेन्सेक्समध्ये सुमारे २०० अंकांनी वाढ झाली होती. सोमवारी दिवाळी पाडव्यानिमित्त बाजार बंद होता. ऑटो, बँकिंग व धातू कंपन्यांच्या समभागांना असलेल्या प्रचंड मागणीमुळे सेन्सेक्समध्ये तेजी आली. बहुतांश कंपन्यांचे उत्साहवर्धक तिमाही निकाल, अमेरिका चीनदरम्यानच्या व्यापारसंघर्षातील संभाव्य तडजोड व शेअर बाजारासंबंधी कर सरकारकडून मागे घेण्याची शक्यता हे घटक सेन्सेक्सच्या तेजीसाठी परिणामकारक ठरले. सेन्सेक्समधील ३० सूचीबद्ध कंपन्यांपैकी २६ कंपन्यांच्या समभागात मंगळवारी वाढ झाली. टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, येस बँक, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, अॅक्सिस बँक या कंपन्यांचे समभाग प्रामुख्याने वधारला.

अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध निवळण्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. उभय देशांत सुधारित व्यापाराबाबत येत्या काही दिवसांत बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, व्यापारचर्चेतील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्धारित वेळेच्या आधीच आम्ही मतैक्य करण्याच्या प्रयत्नात आहोत. यावेळी ट्रम्प यांनी निश्चित कालावधीचा उल्लेख केला नाही, परंतु त्यांच्या सकारात्मक पवित्र्यामुळे गुंतवणूकदारांचे मनोधैर्य उंचावले व त्यांनी समभागखरेदीवर भर दिला.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल बहुतांश आघाडीच्या कंपन्यांनी घोषित केले असून प्रमुख कंपन्यांच्या नफ्यात चांगली वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक मरगळीच्या पार्श्वभूमीवर हे निकाल गुंतवणूकदारांसाठी उत्साहवर्धक ठरले आहेत. आघाडीच्या कंपन्यांकडून चांगला लाभांशही दिला जात असून या प्रमुख कंपन्यांच्या समभागांना मंगळवारी चांगली मागणी होती.

टाटा मोटर्स टॉप गिअरवर
गुंतवणूकदारांच्या फारशा पसंतीचा नसलेल्या टाटा मोटर्सच्या समभाग मंगळवारी तब्बल १७ टक्क्यांनी उसळला (१७२रु.). यामुळे या कंपनीच्या बाजार भांडवलात ७,१०३ कोटी रुपयांची भर पडली व ते ४९,८२१ कोटी रुपयांवर पोहोचले. टाटा मोटर्सने नुकतेच आपले तिमाही निकाल घोषित केले. हे निकाल अपेक्षेहून अधिक चांगले आल्याने गुंतवणूकदारांनी त्याचे स्वागत केले.

Protected Content