पिंपरी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील कोरोना वॉर रूमला आकस्मीक भेट देऊन तेथील उपलब्ध सुविधांची पाहणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड शहराला ङ्गसरप्राईज व्हिजिटफ दिली. पवार यांनी यावेळी महापालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.
पिंपरीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे शासन व प्रशासनापुढे आव्हान आहे. त्या अनुषंगाने पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. ऑटो क्लस्टर येथील सेंटर महापालिकेने उभारले आहे. या सेंटरची पाहणी करून कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी गुरुवारी शहराला भेट दिली. कोरोना वॉर रुममध्ये महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादरीकरण करून कोरोनाबाबतची माहिती दिली. शहरातील रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदींबाबत पवार यांनी आढावा घेतला.
प्लाझ्माबाबत काय परिस्थिती आहे, असे पवार यांनी विचारले. आवश्यक असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार केले जातात. कोरोनामुक्त रुग्णांकडून प्लाझ्मादान केले जाते. त्यासाठी महापालिकेकडून सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. महापालिकेला त्वरित मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी केरळ येथील परिचारिकांच्या पर्यायाचा विचार केला जात होता. मात्र त्यांच्याकडून दरमहा ४५ हजार रुपये मानधनाची मागणी झाली. याबाबत शरद पवार यांनी आयुक्तांना विचारले. केरळच्या एका परिचारिकेला दरमहा ४५ हजार रुपये मानधन द्यावे लागले असते, त्याच पद्धतीने महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या परिचारिकांकडून देखील तितक्याच मानधनाची मागणी होऊन त्यांनाही तेवढेच मानधन द्यावे लागले असते. त्यामुळे केरळच्या परिचारिकांची भरती केली नाही, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.