बार्शी, सोलापूर, वृत्तसेवा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातवारे केले यावरुन राजकीय वातवरणात चर्चा रंगली आहे.
सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बार्शी इथं झालेल्या जाहीर सभेत आज शरद पवारांचे भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांना पवारांनी लक्ष्य केले. ‘विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलं होतं. त्या अनुषंगानं बोलताना पवार म्हणाले, ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही.’ हे वाक्य बोलताना पवार यांनी विशिष्ट प्रकारे हातवारे केले. पवारांच्या भाषणाचं चित्रण करणाऱ्या टीव्ही कॅमेऱ्यांनी ते हातवारे टिपले. काही वेळातच ते सर्वत्र व्हायरल झाले आणि चर्चेला उधाण आलं. भाजपनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसानं असं करणं शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेलाच होता, आता पराभवाच्या भीतीनं ते अधिकच बिथरले आहेत,’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी केली.