नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले असतांना खुद्द पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीतील चर्चेचा तपशील दिला आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला असतांनाच आज शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीचा तपशील दिला. यात प्रामुख्याने लक्षद्वीप येथील राष्ट्रवादीचे खासदार मोहंमद फैजल यांनी तेथील प्रशासकांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार केल्याने पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे याबाबतची माहिती देऊ यावर कार्यवाहीची मागणी केली.
दरम्यान, संजय राऊतांवर ईडीच्या कारवाईबाबत देखील पवार यांनी चर्चा केल्याची माहिती दिली. राऊत यांच्यावर ईडीची कारवाई कशासाठी ? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांना ईडी कारवाई, ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत, याबाबत मी मोदींना कल्पना दिली असे पवार म्हणाले, तसेच केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे. राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मोदींना दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
यासोबत शरद पवार यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा देखील या बैठकीत उपस्थित केला. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे विषय मोदींच्या कानावर घातले. या २ विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी-सेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे. इतरांच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही. मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करणार, आणि यानंतर आमचेच सरकार येणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.