पुणे (वृत्तसंस्था) पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा बदला एअरस्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात तीनशेहून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला. मात्र, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. ते चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. दरम्यान, पवारांच्या या विधानानंतर एअर स्ट्राईकवरुन चांगलच राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पवार चाकण येथे आले होते. त्यावेळी बोलताना, पुलवामा हल्ल्याबाबत पवारांनी मोठा गौफ्यस्फोट केला. पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा, मी यापूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करा, असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित नव्हते, असेही पवारांनी सांगितले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते, असे सांगत पवारांनी मोदींवर टीकाही केली होती. पुलमावा हल्ल्यानंतर देशात सीमारेषेवर तणाव होता अन् ही 56 इंचाची छाती यवतमाळमध्ये येऊन बोलत होती, असे म्हणत मोदींना टोलाही लगावला. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.