नागपूर-वृत्तसेवा | शरद पवार यांनी आजवर जाती-जातींमध्ये भांडणे लावली असून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याला त्यांचाच मोठा विरोध असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज येथे आयोजीत पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यात त्यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर टिका केली. यात त्यांनी प्रामुख्याने शरद पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटीबध्द आहोत. मात्र शरद पवार यांचा याला विरोध आहे. त्यांच्या मनात असते तर मंडल आयोग लागू करतांनाच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. तथापि, त्यांनी तसे केले नाही. एवढेच नव्हे तर पवार यांनी आजवर जाती-जातींमध्ये भांडण लावण्याच्या पलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. आगामी आठ ते दहा महिने हे पक्ष संघटनेसाठी द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुतीला दणदणीत यश मिळणार असल्याचा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.