मुंबई (वृत्तसंस्था) माझ्यावर हल्ला झाला तेव्हा शरद पवार साहेबांनी सर्वतोपरी मदत केली. भुजबळ, आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाही, असे ते मला म्हणाले होते. जेव्हा सर्व काही संपले असे वाटत होते, त्याचवेळी साहेबांनी पुनर्जन्म दिला, अशी भावूक प्रतिक्रिया राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशंवतराव चव्हाण सेंटर येथे बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जात असून, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या कार्याचा सन्मान केला. छगन भुजबळ यांनी बोलतांना म्हणाले की, पवार साहेब नेहमीच सहकाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. सर्व काही संपले असे वाटत होते, त्याचवेळी साहेबांनी पुनर्जन्म दिला,असे भुजबळ म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला जर कोणता उत्कृष्ट मुख्यमंत्री लाभला असेल, तर ते म्हणजे शरद पवार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जी वास्तू उभी आहे, त्याची पायाभरणी पवार यांनी केली आहे. सर्वच क्षेत्रात साहेबांनी आपला ठसा उमटवला आहे. जो प्रश्न आपल्याला समजतही नाही, त्या प्रश्नाची पवार यांनी सोडवणूक केलेली असते. लातूर भूकंप, भूज भूकंप या आपत्तींमध्ये संवेदनशील परिस्थिती त्यांनी योग्यरित्या हाताळली. मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी काही तासात मुंबई पूर्ववत केली.