मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील ‘महाविकास आघाडी’चे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे नव्या सरकारसंदर्भात अद्याप बोलण्यासारखे काही नाही, असे सांगून शरद पवार यांनी आज (दि.२१) पुन्हा सस्पेन्स वाढवून सगळ्यांना गॅसवर ठेवले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘आम्ही काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू राहील. येत्या शुक्रवारपर्यंत मुंबईत महत्वाचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता आहे,’ असे ते म्हणाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सरकार स्थापनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली. राज्यात पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी अजूनही काही मुद्दे अधिक स्पष्ट व्हायला हवेत, असे त्यांनी सांगितले. ‘अजूनही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे आणि आम्ही मुंबईत जात आहोत,’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.
त्याचवेळी शरद पवार यांनी सरकार स्थापनेसंदर्भात वक्तव्य करून पुन्हा सस्पेन्स वाढवला आहे. ‘याबाबत अजूनही काही सांगण्यासारखे नाही,’ असे पवार म्हणाले. यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावर शिवसेनेचे संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.