पुणे (वृत्तसंस्था) आपले अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी आणि पवार घराण्यावर टीका करत आहेत. मात्र, आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, अशा शब्दांत मोदींना प्रत्युत्तर देत भाजपचा पराभव करणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात केले. ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, काँग्रेसच्या अनुसूचित जाती व जमाती आघाडीचे प्रमुख डॉ. नितीन राऊत, पी. ए. इनामदार, प्रवीण गायकवाड, उल्हास पवार, खासदार अॅड. वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, रमेश बागवे, चेतन तुपे, काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, हरीश चव्हाण, रवींद्र माळवदकर, बबन साळुंखे, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, कमल ढोले पाटील आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे पवार घराण्यावर टीका केली होती. त्याचा समाचार घेत त्यांनी आतापर्यंत पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका केली जात होती, आता माझेही नाव घेतले जात आहे. पण मोदी साहेब आम्ही घराच्या संस्कारात वाढलेलो आहोत. मोदींना घराचा अनुभवच नाही. घरातले कुठे आहेत, त्याचा पत्ता लागत नाही. कधीतरी त्यांचे फोटो पहायला मिळतात, आणि हे दुसऱ्याच्या घराची चौकशी करतात, असा टोलाही पवार यांनी लगावला.