खामगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | फक्त खामगावात साजरा होणाऱ्या श्री जगदंबा देवीच्या शांती उत्सवाला यंदा ९ ऑक्टोंबर रोजीच्या कोजागिरी पोर्णिमेपासून प्रारंभ होत आहे.
श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळ (मोठी देवी) तर्फे जगदंबा देवीची ९ ऑक्टोबर रोजी विधीवत पुजाअर्चा करुन सायंकाळी ७ वाजता स्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी शहरातील विविध मंडळांतर्फे मंडप, विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. जगदंबा चौकातील जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे बसविण्यात येणारी देवी मोठी देवी म्हणून सर्वदूर ओळखली जाते. या देवीला ११४ वर्षाची परंपरा आहे. १९०८ साली केरबा परशुराम आनंदे यांनी कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी देवीची स्थापना केली होती. कोरोनाचे दोन वर्ष वगळता तेव्हापासून आजपर्यंत हा उत्सव शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे. यंदा ९ ऑक्टोबर रोजी देवीची विधीवत पूजा स्थापना करून देवीसमोरील पर्दा सायंकाळी ७ च्या सुमारास उघडण्यात येणार आहे. यंदा देवीचा हा उत्सव १२ दिवस भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ७ व रात्री ९ वाजता देवीची आरती हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. १७ ऑक्टोंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ अशी राहणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी सत्यनारायणाची पुजा करण्यात होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. देवीचे विसर्जन जनुना तलावात करण्यात येणार आहे.
विजयादशमीला असुरांचा संहार करुन जेव्हा देवी परत येते तेव्हा ती क्रोधीत असल्याने तिचा चेहरा लाल झालेला असतो. म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो व तिला शांत करण्यासाठी पुजा, अर्चना, आराधना, आरती व जयजयकार करुन मातेस शांत करण्याकरीता हा उत्सव साजरा केला जातो. म्हणून या उत्सवाला शांतीउत्सव म्हटले जाते, नवसाला पावणारी ही मोठी देवी म्हणून ओळखाला जाते. जगदंबा उत्सवाच्या १२ दिवसाच्या कालावधीत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविकभक्त येथे दर्शनासाठी येत असतात. देवीच्या भव्यदिव्य मंडपाभोवती व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. त्याचे काम अंतीम टप्यात आहे. जगदंबा चौकात ओटी, साड्या, प्रसाद, नारळ, हार आदींची दुकाने थाटण्यात येत आहेत. हा उत्सवाच्या काळात जगदंबा देवीचा दरबार २४ तास भक्तांना दर्शनासाठी खुला ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाचे उत्तम उमरकर यांनी दिली. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.