पुणे–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा धार्मिक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही मुस्लिम महिलांनी या ठिकाणी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप नेते नितेश राणे आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कृतीला ‘ऐतिहासिक वारशाचा अपमान’ म्हणत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
नितेश राणे यांनी एका व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना स्पष्ट इशारा दिला की, “शनिवार वाडा हा आपल्या शौर्याचा आणि हिंदू इतिहासाचा प्रतीक आहे. तिथे नमाज पठण करणे हा अपमान आहे. जर तुम्हाला तिथे नमाज पठण करायचे असेल, तर मग आमच्या हिंदुत्ववादी संघटना हाजी अलीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करतील आणि तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी अपेक्षा ठेवा.”

राणे पुढे म्हणाले, “तुमच्याकडे मशिदी आहेत, मग तिथेच नमाज पठण का करत नाही? शनिवार वाडा हा उपासनेसाठी नव्हे, तर मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. धार्मिक भावना भडकवण्यासाठी असा प्रकार करणे अक्षम्य आहे.” त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिक्रिया योग्य असल्याचेही नमूद केले आणि म्हटले की, “जर आमचे कार्यकर्ते हनुमान चालीसा म्हणाले, तर कोणी त्याला विरोध करू नये; कारण धर्मनिष्ठ भावनेचा प्रत्युत्तर धर्मनिष्ठतेनेच दिला जाईल.”
या प्रकरणावर भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घटनेला “ऐतिहासिक वारशाचा अपमान” म्हणत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, रविवार (१९ ऑक्टोबर) रोजी मेधा कुलकर्णी, सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाडा येथे जाऊन निषेध आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांनी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून आणि शेणाने ‘शुद्धीकरण’ केल्याचा दावा केला.
या निषेधादरम्यान पोलिस आणि निदर्शकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. शनिवारी वाडा प्रशासनाने घटनास्थळी सुरक्षा वाढवली असून, अशा प्रकारचे धार्मिक कृत्य पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.



