
जळगाव प्रतिनिधी । मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांच्या मारेकऱ्यांना पहूर येथून आज दुपारी पोलिसांनी अटक केली आहे. दुसरीकडे सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिस स्थानकासमोर येऊन आरोपींना आमच्या ताब्यात दया, म्हणून गोंधळ घातल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. या प्रकरणाचा पोलीसांनी लागलीच सूत्र फिरवली. त्यानुसार मोहितराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेल मागे ,जळगाव) , सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) या दोघांनी मिळून खून केला होता. घटना उघडकीस आल्यापासून एमआयडीसी पोलीस दोघं संशयितांच्या मागावर होते. दोन्ही आरोपी पहूर येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पोलिस स्थानकातील कर्मचारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, किशोर कळस्कर, मनोज सुरवाडे, निलेश पाटील यांचे पथक रवाना झाले. दरम्यान दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान मुन्ना व सनी या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
दुसरीकडे आरोपी यांना अटक केल्याची माहिती मिळताच सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिस स्थानकासमोर येऊन गोंधळ घातला. दोघा आरोपींना समोर उभे करून त्यांना फटके मारण्याचा निर्धार वजा संताप व्यक्त केला. यावेळी मयत देशमुख यांचे कुटुंबियासह महिला सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान दोघं आरोपींची एमआयडीसी पोलीस स्थानकात कसून चौकशी सुरु आहे. खुनाचे नेमके कारण पोलीस जाणून घेत आहे.