जळगाव प्रतिनिधी । शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी आरोपीचे नाव माहित पडले असून त्याच्या शोधार्थ पथकं रवाना केले असल्याची माहिती दिली आहे.
शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा पहाटे खून झाल्याचे उघडकीस आले होते. पोलीस तपासात शाम दीक्षित याने चार जणांसह शहरातील बस स्थानक लगत असलेल्या रिगल एका हॉटेलमध्ये मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्य प्राशन केले. पोलिसांनी रात्री सोबत मद्यपान करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर शाम दीक्षित सोबत मुन्ना नामक तरुण असल्याची माहिती समोर आली. प्रत्यक्षदर्शि मित्रांनी दिलेल्या माहिती नुसार शाम दीक्षित सोबत मुन्नाचा रात्री १० वाजेपासून वाद सुरु होता. मद्यप्राशन करत असतांना देखील दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु होती. यावेळी दोघांमध्ये त्याच्या मित्रांनी मध्यस्थी केली. परंतू त्यांच्यातील वाद मिटत नव्हता. दोघांमध्ये नेमका वाद कशावरून सुरु होता, हे मात्र अद्याप कळालेले नाहीय. दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे.