मुंबई । पेण इथल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर राज्यात शक्ती कायद्याला लवकर चालना देण्याची अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी गृहमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
पेण, रायगड इथल्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने एका ३ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणामध्ये आरोपी हा पॅरोलवर बाहेर आला होता हे निष्पन्न झालं आहे. या पार्श्वभूमिवर, डॉ. नीलम गोर्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले आहे.
यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या शक्ती कायद्यात सायबर गुन्ह्यात देखील आरोपीला कडक कारवाई होण्याबाबत तरतूद केली गेली असली तरी देखील शक्ती कायदा लवकरात लवकर आस्तित्वात येण्यासाठी गृहविभागाकडून तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. काही सामाजिक संस्थांना शक्ती कायद्यात काही उपयोजना सुचव्याचा आहेत. याबाबत सूचना मागविण्यासाठी स्वतंत्र ई-मेल घडण्याची आपणास सूचना करत असून कायद्याबाबत गठीत विधिमंडळाची बैठक लवकर घेण्याची सूचना गोर्हे यांनी केली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला पॅरोलवर सोडण्यात येऊ नये असेही त्यांनी सुचविले आहे.
यासोबत सर्व सोशल वेबसाईटवर लॉगीन करणार्या सर्व व्यक्तीचे केवायसीच्या धर्तीवर त्याचे खात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न करणे बंधनकारक करावे, जेणेरुन गैरप्रकार /सायबर गुन्हे/अत्याचार करणार्या आरोपीची सर्व माहिती तात्काळ उपलब्ध होईल.