अलिबाग वृत्तसंस्था
अलिबागमधील मालमत्तेचा लाभार्थी असल्याच्या आरोपांतून प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता जप्तीची केलेली कारवाई निराधार असल्याचे नमूद करत लवादाने आयकर विभागाला फटकारले आहे. आयकर विभागाने रायगडमधील अलिबाग येथील शाहरुखच्या शेतजमीन, फार्महाऊस आणि भूखंडावर जप्तीची कारवाई केली होती. त्याची किंमत अंदाजे १५ कोटी रुपये होती आहे. या प्रकरणात आयकर विभागाने शाहरुख खान आणि मेसर्स देजा वू फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आरोपी केले होते.
लवादाचे प्रमुख डी. सिंघई आणि सदस्य तुषार व्ही. शाह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शाहरूख आणि त्याच्या कंपनीविरोधातील कारवाईच्या आदेशावरूनही लवादाने आयकर विभागावर ताशेरे ओढले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत व्यवसायाच्या हेतूने झालेल्या देवाण-घेवाणीला बेनामी व्यवहार झाल्याचे म्हणू शकत नाही. कारण कर्जाच्या माध्यमातून पैशांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अलिबागमधील मालमत्ता ही बेनामी संपत्ती नाही आणि आयकर विभागाने केलेली जप्तीची कारवाई अयोग्य असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला आहे.