शहापूर केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील केंद्रीय शाळा शहापूर येथे नुकतेच केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकरखेडा शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शहापूर केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख विकास सखाराम वराडे हे उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामरोद शाळेच्या उपशिक्षिका राजेश्वरी राजपूत यांनी शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. शाळा स्तरावर हा कार्यक्रम दिनांक २०/४/२०२४ पर्यंत राबवण्याचा असून दाखलपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच गावचे पोलीस पाटील, सरपंच व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्याचे राजेश्वरी राजपूत मॅडम यांनी उपस्थितांना सांगितले.

कार्यक्रमात जामनेर तालुका टॅलेंट सर्च परिक्षेत शेळगाव शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी राजु पाटील जामनेर तालुक्यात प्रथम आणि ऋषीकेश शिवाजी जिरी हा विद्यार्थी दहाव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत आलेला आहे. तसेच तळेगाव शाळेचा विद्यार्थी चेतन रविंद्र माळी हा जामनेर तालुक्यातून तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झाला आहे.याबद्दल शेळगाव शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती प्रतिभा सुतार आणि तळेगाव शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती कविता इंगळे यांचेसह संपूर्ण शिक्षक स्टाफचे आणि विद्यार्थ्यांचे तसेच एन एम एम एस परिक्षेत तळेगाव या शाळेचे आठवीचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्या बद्दल पदवीधर शिक्षक विनोद पाटील, नंदकिशोर शिंदे, गोकुळ जोहरे यांचेसह स्टाफचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

केंद्रप्रमुख विकास वराडे यांनी शालेय पोषण आहार तसेच प्रशासकीय विषय यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात टाकरखेडा शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी हे आपले दैवत आहे. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल त्यासाठी प्रयत्न करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळेगाव शाळेचे पदवीधर शिक्षक नंदकिशोर शिंदे यांनी केले व राजेश्वरी राजपूत यांनी आभार मानले. याप्रसंगी शहापूर केंद्रातील सर्व जि प शाळांचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक बंधू भगिनी आणि अंगणवाडी सेविका भगिनी हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणातून गावागावातून दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील पालकांची मानसिक तयारी होत असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासनाची तयारी सुध्दा दिसून येते असे प्रशिक्षणार्थींनी सांगितले.

 

Protected Content