Home उद्योग भुसावळात पेट्रोल पंपावर ग्राहकांची झुंबड ; डिझेलसाठी लागल्या लांबच लांब रांगा !

भुसावळात पेट्रोल पंपावर ग्राहकांची झुंबड ; डिझेलसाठी लागल्या लांबच लांब रांगा !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात अचानक डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्रीपासून भुसावळात तब्बल १० ते १२ प्रमुख पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला आहे. यामुळे डिझेल खरेदीसाठी येणाऱ्या वाहनधारकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर रिकाम्या हाताने फेऱ्या लागत आहेत. ऐनवेळी निर्माण झालेल्या या संकटामुळे स्थानिक व्यापारी आणि वाहनचालकांची कमालीची गैरसोय होत आहे.

वाहने रस्त्यातच पडली बंद :
डिझेलचा पुरवठा अचानक खंडित झाल्याचा फटका थेट वाहतुकीला बसला आहे. रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांमधील इंधन अचानक संपल्याने, महामार्गावर आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अनेक वाहने जागेवरच बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गाडी ढकलत नेण्याची वेळ चालकांवर आली असून, यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.

तिरुपती पेट्रोल पंपावर ग्राहकांची झुंबड :
शहरातील सर्व पंप बंद असताना, जामनेर रोडवरील ‘तिरुपती सर्व्हे पेट्रोल पंपा’वर मात्र सकाळपासून सुमारे ६ हजार लिटर डिझेलचा साठा उपलब्ध होता. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच वाहनधारकांनी या पंपावर डिझेल भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

साठा संपण्याची भीती; प्रशासनाचे दुर्लक्ष :
तिरुपती पंपावर सध्या साठा उपलब्ध असला, तरी ग्राहकांची वाढती मागणी पाहता हा ६ हजार लिटरचा साठा पुढील दोन तासांतच संपण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा साठा संपल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. या अचानक उद्भवलेल्या इंधन टंचाईवर प्रशासन काय पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound