जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ होत असून जिल्ह्यातील तेरापैकी सात मध्यम प्रकल्पांत 100 टक्के उपयुक्त साठा झाल्याने हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत.
जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 18.63 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे चार दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून आज 9 हजार 42 व्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 527.74 दलघमी म्हणजेच 18.63 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.67 टीएमसी, गिरणा 9.23 टीएमसी, तर वाघूर धरणात 7.73 टीएमसी इतका उपयुक्त साठा असून गिरणा धरणात 49.91 टक्के तर वाघुर धरणाम 88.12 टक्के इतका पाणीसाठा आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 172.83 दलघमी म्हणजेच 6.10 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील 96 लघु प्रकल्पात 111.76 दलघमी म्हणजेच 3.95 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड या सात प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा आहे. तर मोर 66.39 टक्के, बहुळा 73.28 टक्के, गुळ 78.07 टक्के, बोरी 83.74 टक्के, अंजनी 43.18 टक्के व भोकरबारी धरणात 7.10 टक्के उपयुक्त साठा असून बोरी धरणाचे 2 दरवाजे 0.10 मीटरने उघडण्यात आले आहे.