पुणे वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पोलीसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यंदा पुण्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यात तब्बल साडे सात हजारांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत
गणेशोत्सवासाठी यंदा साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुमारे बारा हजार पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकांना परवानगी नसल्याने यावर्षी सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी आणि सातशे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी सज्ज होणार आहेत. आवश्यकतेनुसार, हा बंदोबस्त वाढविण्यात येईल, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याबरोबरच गणपती बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी करण्याचे अवाहन महापौर मुरलीधर मोहोळ आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पत्रकार परिषदेत केले. पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त संभाजी कदम, मितेश गट्टे, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन उपस्थित होते. कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्ण कमी होताना दिसत आहेत. गणेशत्सवामध्ये पावणे पाच लाख नागरिक गणपती बाप्पा बसवतात. त्या निमित्ताने विसर्जनाच्या दिवशी सुमारे 25 लाख नागरिक रस्त्यावर येतात. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पालिका आणि पोलिसांच्या आवाहाना प्रतिसाद द्यावा, अशी विनंती सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पुणेकरांना केली.