Home Cities अमळनेर शिरसाळे शाळेत बोगस भरतीचा गंभीर आरोप: लाखो रुपयांचा अपहार !

शिरसाळे शाळेत बोगस भरतीचा गंभीर आरोप: लाखो रुपयांचा अपहार !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील भिका यशोध चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील ज्युनिअर कॉलेज या शाळेत बेकायदेशीर तसेच गैरमार्गाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तक्रारदार भरत शांताराम चौधरी यांनी आज (सोमवार) आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, शासनाची फसवणूक करत हडप केलेला लाखो रुपयांचा निधी परत मिळवावा, अशीही मागणी त्यांनी केली.

चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले की, जर शासनाकडून या संदर्भात कोणत्याही पद्धतीने न्याय मिळाला नाही, तर आपण न्यायालयीन लढाई लढण्यास पूर्णपणे तयार आहोत. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना वेळोवेळी निवेदने व पत्रव्यवहार केले आहेत, परंतु अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भरत चौधरी यांच्या मते, या शाळेच्या संचालक मंडळांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या व्यक्तींची नियमबाह्यपणे भरती करून त्यांचे वेतन काढले आहे, ज्यामुळे शासनाची आणि शाळेची फसवणूक झाली आहे. शासनाने कुठल्याही नवीन भरती सुरू करण्याचे आदेश दिले नसतानाही, या शाळेच्या संस्थाचालकांनी नवीन आणि बोगस पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

तक्रारदार भरत चौधरी यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, १२ जानेवारी २०२२ रोजी निवडून आलेल्या संचालक मंडळाने आजपर्यंत काम पाहिले आहे. त्यांनी याच पदाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली. जानेवारी २०२२ नंतर संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी संगनमताने बेकायदेशीररित्या मागील कालावधीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती दाखवून बनावट कागदपत्रे, खोटी माहिती किंवा बोगस संच मान्यतेच्या प्रती तयार केल्या. या बोगस आणि बेकायदेशीर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर लाखो रुपये पगार काढून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकून लूट केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी काही पुरावेही सादर केल्याचे नमूद केले. या गंभीर आरोपामुळे शिरसाळे आणि अमळनेर तालुक्यात शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound